|
|
|
श्रीमान शांताराम कृष्णाजी ऊर्फ बापूसाहेब आणि श्रीमती नलिनीताई शांताराम पंतवालावलकर यांचे स्वप्न आणि मुणगे गावातील ग्रामस्थ, कार्यकर्ते, वेळोवेळी संस्थेला देणगीरूपाने सहाय्य करणारे हितचिंतक अशा अनेकांच्या सहकार्याने संस्थेची पन्नास वर्षांची वाटचाल आज पूर्ण होत आहे. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. निर्मिती आणि जडणघडण या अतिशय आनंद देणा-या बाबी असतात. अपत्याचा जन्म आणि त्याची वाढ यात जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. स्व. बापूनी आपल्या सर्वाना सोबत घेऊन “श्री भगवती एजुकेशन सोसायटी” या संस्थेची स्थापना सन १९६६ साली केली. आज त्या संस्थेला ५० वर्ष झाली. या पन्नास वर्षात अनेक चढ-उतार संस्थेने अनुभवले. स्व.बापुना कायम सोबत करणारे आमचे अनेक आधारस्तंभ एक-एक करत या जगाचा निरोप घेऊन गेले. स्वत: बापू आणि ताई गेल्यावर तर आम्हाला आमचे मातृ-पितृछत्रच हरवल्यासारखे वाटले. मात्र त्या धक्क्यातून सावरून आपण सर्वांनी आज, समर्थपणे या संस्थेची वाटचाल कायम ठेवलेली आहे. अर्थात ही शिकवण देखील आपण बापुंकडूनच घेतलेली आहे.
स्व. बापूनी केवळ विद्यालय सुरु केले असे नाही तर त्या विद्यालयाला सुरुवातीपासून दर्जेदार शिक्षकांची नियुक्ती होईल याच्यावर भर दिला. याचाच परिणाम म्हणून आज या शाळेचा / संस्थेचा कार्यभार, याच विद्यालयात शिक्षण घेवून स्वत:च्या पायावर उभे राहिलेले गावातील बहुतेक माजी विद्यार्थी वरिष्ठ पदाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीपणे सांभाळत आहेत. यात सद्यस्थितीत गावात स्थायिक असणारे माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आहेत, हे विशेष. कारण आजकाल बहुतेक व्यक्ती आत्मकेंद्री बनत असताना मुणगे गावातील तरुण श्री भगवती एजुकेशन संस्थेच्या माध्यमातून तसेच गावातील इतरही अनेक संस्थाच्या माध्यमातून गावाची सेवा करीत आहेत, हे चित्र खूपच आशादायक आहे. गावाची वाटचाल विकासाच्या दिशेने होत असल्याचे हे प्रतिक आहे. अर्थात हा बदल केवळ शिक्षण, शिक्षण आणि शिक्षणामुळेच होऊ शकतो. विकास, आत्मसन्मान या बाबी माणसाचे आयुष्य समाधानकारक बनवतात. हा विकास आणि आत्मसन्मान आपल्याला शिक्षणामुळेच मिळू शकतो. आजही गावातील ज्या तरुणांचे शिक्षण पूर्ण झाले नाही, त्यांनादेखील आपली मुले खूप शिकावीत असे मनोमन वाटते. अशा तरुणांकरिता श्री भगवती एज्यूकेशन सोसायटी ही संस्था म्हणजे आधारवड आहे. अशा अनेक पालकांनी आमच्याकडे त्यांची अपूर्ण शिक्षणाची खंत व्यक्त करतानाच संस्थेने सुरु केलेल्या स्व. वीणा सुरेश बांदेकर कनिष्ठ महाविद्यालयाबाबत संस्थेला म्हणजेच आपल्या सर्वाना मनापासून धन्यवाद दिले आहेत. अनेक पालकांनी गावात कनिष्ठ महाविद्यालय झाल्यामुळेच केवळ आपण आपल्या मुलांना पुढील शिक्षण देण्याची हिम्मत केली, असे आवर्जून सांगितले. सद्यस्थितीत आपण अतिशय माफक शुल्क आकारणी विद्यार्थ्यांकडून करीत आहोत. या शुल्कातूनच शिक्षकांचे वेतन, महाविद्यालयाचा दैनंदिन खर्च, देखभाल आदी बाबींसह, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अत्त्यावश्यक असलेले साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याला विद्यार्थ्यांकडून, त्यांच्या पालकांकडून आणि शिक्षकांकडून समाधानकारक सहकार्य मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या भावितव्याकरीतादेखील आपल्या महाविद्यालयातील शिक्षक वेळोवेळी चांगले मार्गदर्शन करतात. १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नोकरीविषयक मुलाखतींची माहिती देणे, मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे, भविष्यात कोणत्या परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागेल या सर्व बाबींची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना सातत्याने देत असतात. मित्रानो, हा सर्व उहापोह सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने तुमच्याशी करण्याचा उद्देश, एवढाच आहे, कि श्री भगवती एज्युकेशन संस्थेचे वेगळेपण आपल्या लक्षात यावे. आम्ही संस्थेच्या वाटचालीकडे “व्यवसाय” म्हणून न पाहता “न्यायदानाचे मंदिर” म्हणूनच पाहीले आहे. यापुढे देखील संस्थेचा हेतू हाच असेल. आपल्या गावातील आणि पंचक्रोशीतील मुलाना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे हाच आमचा हेतू असून, आपली सर्वांची साथ लाभली तर शिक्षणाच्या पुढील पाय-या देखील चढण्याचा संस्थेचा मानस राहील. वृक्षारोपण - कलम लागवड - सुवर्ण महोत्सवी वर्षात अनेक कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार असून त्याची सुरुवात नुकतीच दि.१९ जून २०१६ रोजी आपल्या कलम बागेत “५१ कलमाची रोपे” लावून करण्यात आली. हा कार्यक्रम किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे कृषीतज्ञ डॉ. विलास सावंत यांच्या उपस्थितीत आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीपाद शंकर पंतवालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. “जिल्ह्यातील इतर अनेक शैक्षणिक संस्था आर्थिक विवंचनेत असताना निसर्गाच्या जवळ जावून आंबा बागेच्या उत्पन्नाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार चालवणारी ही एकमेव संस्था आहे” अशा शब्दात डॉ. विलास सावंत यांनी संस्थेच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. विद्यार्थी –शिक्षकांच्या सहयोगाने मासिक - सुवर्ण महोत्सवी वर्षातील दुसरा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे आपल्या संस्थेच्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे “मासिक” सुरु करण्यात आले आहे. या मासिकामध्ये शिक्षकांप्रमाणेच विद्यार्थ्यानाही सहभागी करून घेण्यात आले आहे. मुलांच्या अंगभूत कलागुणांना त्यामुळे वाव मिळणार आहे. मुलांचे लेख, कविता, चित्रकला अशा विविध बाबींचा अंतर्भाव या अंकामध्ये करण्यात आलेला आहे. सर्व मुलानी या संधीचा लाभ घ्यावा याकरिता शिक्षकांप्रमाणेच पालकांनीही आपल्या पाल्ल्याना प्रोत्साहित करावे. कला-क्रीडा स्पर्धा आणि विविध शिबिरांचे आयोजन - सुवर्ण महोत्सवी वर्षात “जिल्हास्तरीय कला-क्रीडा स्पर्धा” आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना मार्गदर्शनपर, प्रबोधनपर ठरणारी “विविध शिबिरे” आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये, शिक्षणाबरोबरच आरोग्य, शेती, व्यवसाय, विकास अशा सर्व बाबींचा समावेश करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी या शिबिरांचा आवर्जून लाभ घ्यावा. स्मरणिका प्रकाशन - सुवर्ण महोत्सव निमित्ताने एक “स्मरणिका प्रकाशित” करण्यात येणार असून आपण सर्वांनी या स्मरणिकेकरीता जाहिरातीच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलावा, अशी अपेक्षा आहे. या स्मरणिकेमध्ये ग्रामस्थाना उपयुक्त ठरेल अशी विविधांगी माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे. याबाबत आपल्या काही सूचना असल्यास मानद सचिवांकडे संपर्क साधावा. सुवर्ण महोत्सवाची सांगता – सुवर्ण महोत्सवाची सांगता मे-२०१७ मध्ये “सौ. नलिनीताई शांताराम पंतवालावलकर विद्यानगरी”, मुणगे येथे करण्यात येणार आहे. सुवर्ण महोत्सव सांगता प्रसंगी “जाहीर कार्यक्रमा”चे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरिता आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपणा सर्वांचा सहभाग - सुवर्ण महोत्सव साजरा करताना एक महत्वपूर्ण उद्देश समोर ठेवण्यात आलेला असून संस्थेचे कार्य मुणगे गाव आणि पंचक्रोशीमध्ये सर्वदूर पोहोचविणे आणि या माध्यमातून पंचक्रोशीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हायस्कूल आणि महाविद्यालयाला पोहोचविणे हा आहे. तसेच यानिमित्ताने शाळेचे आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व आजी माजी विद्यार्थी यांना एकत्र आणून आपल्या गावाबद्दल, आपल्या शाळेबद्दल, आपल्या संस्थेबद्दल असलेला जिव्हाळा जपणे हा आहे. म्हणूनच हा सोहळा आपल्या सर्वांच्या सहभागाने होणे अपेक्षित आहे. |